“He Is Caring And Kind…” सियाने कधी केलेलं केतनचं कौतुक, आता हत्याकांडानंतर तोच साखरपुड्याचा VIDEO चर्चेत

पुणे : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे पैलू समोर येत आहेत. लोहगडावरून पडून झालेल्या केतनच्या मृत्यूने सुरुवातीला अपघाताचे स्वरूप घेतले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून कट रचून केलेली हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांच्यावर हत्येचा आरोप असून, दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आता केतन आणि सियाच्या साखरपुड्याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
फेब्रुवारी महिन्यात केतन आणि सिया यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या कार्यक्रमातील एका व्हिडिओमध्ये दोघेही स्टेजवर आनंदी दिसत आहेत. यावेळी सूत्रसंचालिकेने सियाला केतनबद्दल प्रश्न विचारला होता. “होणारा नवरा म्हणून केतनमधील तुला सर्वात जास्त कोणती गोष्ट आवडते?” असा सवाल करण्यात आला. त्यावर सियाने हसत केतनकडे पाहिले आणि तो “खूप काळजी घेणारा आणि दयाळू आहे” असे सांगितले. सियाच्या या कौतुकाने केतनच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. उपस्थितांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या क्षणाला दाद दिली होती.

मात्र, काही महिन्यांनंतर याच नात्याचा शेवट धक्कादायक पद्धतीने झाल्याचा आरोप होत असल्याने हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण या जुन्या क्षणांची आणि सध्याच्या घडामोडींची तुलना करत प्रतिक्रिया देत आहेत.

या प्रकरणाची सुरुवात 18 जून रोजी झाली. केतन अग्रवाल हा सिया गोयलसोबत लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता. यावेळी तो दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला ही घटना अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, केतनच्या कुटुंबीयांना काही बाबींवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. त्यानंतर तपासाची दिशा बदलण्यात आली.


पोलिसांनी तपास करताना सिया आणि चेतन चौधरी यांच्याकडून माहिती घेतली. तपासादरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हा अपघात नसून नियोजित कट असल्याचा दावा केला. यानंतर सिया आणि चेतनला अटक करण्यात आली असून, दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
केतन हा पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून सध्या या हत्येचा नेमका कट, त्यामागील कारणे आणि घटनाक्रम याचा सखोल तपास सुरू आहे. साखरपुड्यातील आनंदी क्षणांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा आणखी वाढली आहे.
