सूपमध्ये आढळले झुरळ, फ्रिजमध्ये आढळले अयोग्य पद्धतीने साठवलेले मांस; तुकाराम मुंडेंच्या FDAची मोठी कारवाई, परवाना रद्द

नागपूर : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यवसायांवर कडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत अनेक नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर धाडी टाकून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
‘मोठ्या हॉटेलमध्येच सुरक्षित आणि स्वच्छ अन्न मिळते’ असा समज असलेल्या ग्राहकांना या कारवायांमधून धक्का बसला आहे. कारण प्रसिद्ध हॉटेल्सच्या किचनमध्येही अस्वच्छता, कीटक आणि अन्न साठवणुकीतील त्रुटी आढळून आल्या आहेत.

नागपूरमधील प्रसिद्ध हीरा स्वीट्सवर FDA विभागाने कारवाई केली. तपासणीदरम्यान किचनमध्ये मृत उंदीर आढळून आल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलली.

तसेच नागपूरमधील अशोका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकाने मागवलेल्या सूपमध्ये मृत झुरळ आढळल्याची घटना समोर आली होती. ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDA विभागाने हॉटेलची तपासणी केली. तपासणीमध्ये अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यानंतर संबंधित रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली.


तपासणीदरम्यान काही ठिकाणी फ्रिजमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ चुकीच्या पद्धतीने साठवले जात असल्याचेही आढळून आले. अन्न साठवणूक, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी अन्नाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार असल्यास FDA विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय भेसळयुक्त अन्न आणि दुधाविरोधातही कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे.
तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली FDA विभागाच्या कारवायांमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
