महायुतीत ‘ऑल इज नॉट वेल’! योगेश कदमांचा तटकरेंना थेट इशारा; ‘मी तोंड उघडलं तर अनेकांचे चेहरे उघडे पडतील’


मुंबई : महायुतीतील अंतर्गत वाद आता उघडपणे समोर येऊ लागला असून, शिवसेना (शिंदे गट)चे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे खासदार सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. या वादात आता मंत्री योगेश कदम यांनी थेट उडी घेत सुनील तटकरेंना कडक इशारा दिला आहे. “आता तडजोडीची कोणतीही शक्यता उरलेली नाही. मी बोलायला सुरुवात केली तर अनेकांचे पितळ उघडे पडेल,” असे म्हणत त्यांनी राजकीय वर्तुळात नवी खळबळ उडवली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना योगेश कदम म्हणाले की, सुनील तटकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर हा वाद संपण्याची शक्यता जवळपास संपली आहे. “मीही त्यांच्यावर कठोर बोलू शकतो, पण सध्या संयम पाळत आहे. मात्र, मागील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पडद्यामागे काय घडले, कोण कोणाला मदत करत होते आणि कोणाची भूमिका काय होती, हे समोर आलं तर अनेकांना उत्तरं द्यावी लागतील,” असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

या वादाची सुरुवात रामदास कदम यांनी सुनील तटकरेंवर केलेल्या जहरी टीकेनंतर झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या एका बैठकीच्या पार्श्वभूमीवर कदम यांनी तटकरेंवर विश्वास ठेवता येत नसल्याचे सांगत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सुनील तटकरेंनीही रामदास कदम यांच्यावर वैयक्तिक टीका केली. त्यांनी कदम यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांच्या मानसिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे दोन्ही नेत्यांतील शाब्दिक संघर्ष अधिकच चिघळला.

दरम्यान, योगेश कदम यांच्या ताज्या प्रतिक्रियेमुळे हा वाद केवळ दोन नेत्यांपुरता मर्यादित राहिलेला नसून, महायुतीतील दोन घटक पक्षांमधील वाढत्या दुराव्याचे संकेत मानले जात आहेत. “आता कॉम्प्रमाईजला स्कोपच उरलेला नाही,” असे स्पष्टपणे सांगत त्यांनी भविष्यात आणखी गौप्यस्फोट होण्याची शक्यता व्यक्त केली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील राजकीय समीकरणांचा उल्लेख करत योगेश कदम यांनी केलेल्या सूचक विधानांमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील हा वाढता संघर्ष वरिष्ठ नेतृत्व कसा हाताळते आणि दोन्ही बाजूंतील वादावर पडदा पडतो की आणखी नवे आरोप-प्रत्यारोप समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!