महिन्याचं बिल होतं फक्त 750 रुपये… स्मार्ट मीटर बसताच थेट 1 लाखांचं वीज बिल; पुण्यातील प्रकाराने उडाली खळबळ
पुणे : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील डोणजे गावात एका महिलेला आलेल्या अवास्तव वीज बिलामुळे स्मार्ट मीटर प्रणाली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावात अवघ्या १० बाय १० फुटांच्या छोट्या घरात राहणाऱ्या महिलेच्या नावावर तब्बल ₹1 लाखांचे वीज बिल आल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या घरात स्मार्ट मीटर बसविण्यात आला होता.

डोणजे येथील रहिवासी शितल चव्हाण यांनी सांगितले की, यापूर्वी त्यांच्या घराचे मासिक वीज बिल साधारण ₹750 इतकेच येत होते. घरात केवळ आवश्यक तेवढ्याच विद्युत उपकरणांचा वापर केला जात असल्याने वीज खर्चही मर्यादित होता. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर पहिल्याच बिलात थेट एक लाख रुपयांची रक्कम पाहून त्यांना मोठा धक्का बसला.
शितल चव्हाण यांच्या घरात एसी, मोठी यंत्रसामग्री किंवा जास्त वीज वापरणारी उपकरणे नसल्याचे सांगितले जाते. मर्यादित वीज वापर असतानाही इतक्या मोठ्या रकमेचे बिल कशाच्या आधारावर तयार करण्यात आले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वी कधीही इतक्या मोठ्या रकमेचे बिल आले नसल्याने या संपूर्ण प्रकरणात काहीतरी गंभीर तांत्रिक त्रुटी असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

या प्रकारानंतर त्यांनी महावितरणच्या संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून बिलाची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. स्मार्ट मीटरमधील बिघाड, चुकीचे रीडिंग किंवा बिल तयार करताना झालेली त्रुटी यापैकी नेमके कारण काय, याची सखोल चौकशी करून योग्य बिल द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्येही विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ठिकाणी वाढीव वीज बिलांच्या तक्रारी समोर येत असल्याने या घटनेकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. त्यामुळे महावितरणने या प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून ग्राहकांचा विश्वास कायम ठेवणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
सध्या या प्रकरणावर महावितरणकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नसले, तरी चौकशीनंतरच प्रत्यक्ष कारण स्पष्ट होणार आहे. मात्र एका छोट्याशा घराला आलेल्या लाखाच्या वीज बिलामुळे स्मार्ट मीटरच्या कार्यक्षमतेबाबत आणि बिलिंग प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.