फळं खरेदी करणाऱ्यांनो सावध! हा VIDEO पाहिल्यानंतर खरेदी करण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल

मुंबई : बाजारातून फळे खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोरिवली पश्चिम परिसरातील एका फळ विक्रेत्याच्या दुकानाचा असल्याचा दावा करण्यात येणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका फळांच्या दुकानात उंदीर फळांवर ताव मारताना आणि फळे कुरतडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, उंदरांनी उष्टी केलेली हीच फळे दुकानदाराकडून थेट ग्राहकांना विकली जात असल्याचा आरोप सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून केला जातोय.
उंदरांमुळे प्लेग, लेप्टोस्पायरोसिस यांसारखे जीवघेणे आजार पसरण्याचा मोठा धोका असतो, अशा परिस्थितीत हा प्रकार समोर आल्याने मुंबईकरांमध्ये घबराट पसरली आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर मुंबईतील अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका बोरिवलीतील कोणत्या दुकानाचा आहे आणि व्हिडिओमध्ये करण्यात आलेले दावे कितपत खरे आहेत, याची अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाकडून पडताळणी सुरू करण्यात आली आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी फळ विक्रेत्यांवर प्रशासन काय आणि कधी कारवाई करणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.