पुणे महापालिकेत महाघोटाळा! नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; बनावट नियुक्तीपत्रांप्रकरणी ‘ही’ बडी नावं चर्चेत


पुणे : पुणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगार तरुण-तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेतील एका शिपायासह काही जणांनी बनावट नियुक्तीपत्रे तयार करून उमेदवारांकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांत कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका शिपायाने त्याच्या बड्या साथीदारांसह मिळून अनेकांकडून लाखो रूपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी महापालिकेचे बनावट लेटरहेड, शिक्के आणि वॉटरमार्कचा वापर करून थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या असलेली बोगस नियुक्तीपत्रे उमेदवारांच्या हातावर टेकवली.

या प्रकरणी पुणे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये डॉ. राजेंद्र बबनराव खेडेकर (विश्वस्त, जेजुरी देवस्थान), शिवानंद बाळासाहेब पाटील (शिपाई, शिक्षण विभाग, पुणे महापालिका, नमिता गोवर्धन बनसोडे आणि इतर काही साथीदारांचा समावेश आहे. हा संपूर्ण काळाबाजार मे २०२२ ते मे २०२४ या कालावधीत महापालिकेच्या आवारात आणि इतर ठिकाणी घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पाटण येथील एका तरुणाला महापालिकेच्या ‘भवन विभागात’ कनिष्ठ अभियंता पदावर नोकरी लावण्याचे आश्वासन आरोपींनी दिले होते. त्याचे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात पोस्टिंग झाल्याचा खोटा आदेशही त्याला देण्यात आला. या बदल्यात आरोपींनी त्या तरुणाकडून वेळोवेळी तब्बल ४५ लाख रुपये उकळले.

मात्र, नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरुणाने महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठवली. महापालिकेने जेव्हा या पत्रांची पडताळणी केली, तेव्हा उपायुक्त आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या आणि बनावट शिक्के मारून हे रॅकेट चालवले जात असल्याचा भयंकर खुलासा झाला.

या प्रकरणात नाव आलेले जेजुरी देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मात्र आपले पत्रक काढून हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “मी स्वतः या प्रकरणातील तक्रारदार असून, पीडित तरुणांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मीच पाठपुरावा केला आहे.

महापालिकेच्या कोणत्याही बनावट कागदपत्रांशी किंवा आर्थिक व्यवहारांशी माझा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. माझी बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि पोलिसांनी बँक खाती व कॉल रेकॉर्ड्सची निष्पक्ष चौकशी करून खऱ्या गुन्हेगारांना समोर आणावे,” अशी मागणी डॉ. खेडेकर यांनी केली आहे.

या टोळीने केवळ एकाच तरुणाला नाही, तर महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोख आणि चेक स्वरूपात लाखो रुपये घेऊन लुटल्याचा संशय आहे. या महाघोटाळ्यात महापालिकेतील आणखी काही मोठे अधिकारी किंवा कर्मचारी सामील आहेत का? याचा शोध घेण्यासाठी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपींचे आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांची तपासणी युद्धपातळीवर सुरू केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!