अखेर ‘तो’ परतला! पुण्यात १० दिवसांनी पावसाचं पुनरागमन; विकेंडला हवामान कसं असेल? बाहेर पडण्याआधी हे वाचाच


पुणे : गेल्या काही दिवसांपासून कडक ऊन आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे. गेल्या दहा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने शुक्रवारी (१७ जुलै) शहरात पुन्हा हजेरी लावत वातावरणात गारवा निर्माण केला.

शुक्रवारी सकाळपासून पुणे शहरासह उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहरात दमदार पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने कमाल तापमानात वाढ झाली होती. त्यातच हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे उकाडा अधिकच असह्य झाला होता.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणेकरांसाठी आणखी आनंदाची बातमी दिली आहे. पुढील ३ ते ४ दिवस शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, हलक्या पावसाच्या सरी कायम राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय, कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असल्याने वातावरण आणखी आल्हाददायक होईल.

आज, शनिवार (१८ जुलै) रोजीही शहर आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे वीकेंडला घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!