NEET निकालाचा धक्का! अँसर कीनुसार 700 प्लस गुणांची अपेक्षा, स्कोअरकार्डवर फक्त 87; बीडच्या ज्ञानेश्वरीचा आक्रोश


बीड : नीट परीक्षेच्या निकालानंतर पुन्हा एकदा परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी येथील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार हिला अँसर की तपासल्यानंतर 700 पेक्षा जास्त गुण मिळतील, असा विश्वास होता. मात्र, निकाल जाहीर झाल्यानंतर तिच्या स्कोअरकार्डवर अवघे 87 गुण दिसल्याने विद्यार्थी आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

ज्ञानेश्वरीने वैद्यकीय प्रवेशासाठी मोठी तयारी केली होती. ती नीट परीक्षेतील टॉपर्सच्या यादीत येण्याचे स्वप्न पाहत होती. परीक्षा झाल्यानंतर तिने अधिकृत अँसर कीच्या आधारे प्रश्न तपासले असता तिला 700 पेक्षा जास्त गुण मिळण्याची शक्यता वाटत होती. त्यामुळे एम्स दिल्लीसारख्या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश घेण्याचे तिचे स्वप्न होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात केवळ 87 गुण मिळाल्याने तिच्या डोळ्यात अश्रू आले.

ज्ञानेश्वरीने ओएमआर शीटमध्ये काहीतरी तफावत असल्याचा दावा केला आहे. निकाल पाहून आपल्याला मोठा धक्का बसल्याचे तिने सांगितले. “मी परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली होती. उत्तरतालिका तपासल्यानंतर माझे गुण जास्त येतील, असा विश्वास होता. मात्र, स्कोअरकार्ड पाहून विश्वास बसला नाही,” अशी भावना तिने व्यक्त केली.

ज्ञानेश्वरीच्या आई मीरा पवार यांनीही निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी मुलीने वर्षभर प्रचंड मेहनत घेतल्याचे सांगितले. “माझ्या मुलीने 18-18 तास अभ्यास केला. अनेकदा जेवणाकडेही दुर्लक्ष केले. एवढी मेहनत करूनही असे गुण कसे मिळाले? आम्हाला ओएमआर शीट प्रत्यक्ष दाखवावी,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, बीड जिल्ह्यात असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. सोहम गवते या विद्यार्थ्यालाही अँसर कीनुसार 522 गुण मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, अंतिम निकालात त्याला केवळ 95 गुण मिळाले. निकाल पाहिल्यानंतर सोहम आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या वादानंतर आता गुणांमधील कथित तफावतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि निकाल प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. ओएमआर शीट आणि गुणांच्या तफावतीबाबत संबंधित यंत्रणेकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!