पुणेकरांनो, रविवारी बाहेर पडणार? जगन्नाथ रथयात्रेमुळे ‘या’ प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीत बदल; पर्यायी मार्ग तपासा

पुणे : रविवारी (१९ जुलै) भगवान जगन्नाथांची रथयात्रा पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विश्रामबाग वाहतूक विभागाने दुपारी ३ ते रात्री ८.३० या कालावधीत काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत. त्यामुळे या वेळेत शहरात प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रथयात्रा स. प. महाविद्यालय येथून दुपारी ३ वाजता सुरू होऊन टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शनिपार चौक, नगरकर तालीम, रमणबाग शाळा, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक आणि टिळक चौक या मार्गाने पुन्हा स. प. महाविद्यालयात येऊन समाप्त होणार आहे.
रथयात्रेदरम्यान टिळक रस्ता, बाजीराव रस्ता आणि लक्ष्मी रस्ता या भागांतील वाहतूक परिस्थितीनुसार वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गांवर जाणे शक्यतो टाळावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि रथयात्रा सुरळीत पार पडण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

उद्या या परिसरात जाण्याचा तुमचा बेत असेल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी वाहतुकीतील बदल तपासा आणि पर्यायी मार्ग निवडून वेळ वाचवा.