ज्येष्ठ नागरिक विवेक गटणे आत्महत्या प्रकरण! तब्बल दोन महिन्यांनंतर एका आरोपीला अटक; १२ आरोपी अद्याप फरार

दौंड : विवेक शंकर गटणे आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील १३ आरोपींपैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी उर्वरित १२ आरोपी अद्याप फरार असल्याने पोलिसांच्या तपासावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

११ मे २०२६ रोजी दौंड येथील रहिवासी विवेक शंकर गटणे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पुत्र अद्वैत विवेक गटणे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर १२ मे २०२६ रोजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील आरोपी आरिफ शमशुद्दीन शेख (वय ५२, रा. कुंभारगल्ली, दौंड) याला दौंड पोलिसांनी १४ जुलै २०२६ रोजी येरवडा परिसरातून अटक केली. पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम, पोलीस शिपाई बोराडे आणि माने यांनी ही कारवाई केली.

आरिफ शेख याला दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १७ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात राजकीय, व्यावसायिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या काही व्यक्तींची नावे असल्याची चर्चा सुरुवातीपासूनच सुरू आहे. त्यामुळे तपासावर दबाव असल्याच्या चर्चाही शहरात रंगल्या आहेत.
१३ पैकी केवळ एका आरोपीला अटक झाली असून उर्वरित १२ आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करून उर्वरित आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी दौंडमधील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी केली आहे. तसेच, दौंड पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी या प्रकरणात निष्पक्ष भूमिका घेत उर्वरित आरोपींविरोधात तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.