पुण्याच्या ड्रग्ज रॅकेटमागे ‘ती’ नायजेरियन महिला! एका फोनवर व्हायची कोट्यवधींची डील; तपासात धक्कादायक खुलासा


पुणे : कात्रज परिसरातून जप्त करण्यात आलेल्या तब्बल ५.७९ कोटी रुपयांच्या मेफेड्रॉन ड्रग्ज प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. पुणे पोलिसांच्या तपासात या रॅकेटमागे ‘बेनी’ नावाच्या एका नायजेरियन महिलेचा हात असल्याचे समोर आले आहे. तिच्याच सूचनेनुसार दिल्लीहून ड्रग्जचा साठा पुण्यात आणण्यात आल्याची माहिती तपासात उघड झाली असून, या प्रकरणाचे धागेदोरे आता दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत.

पोलिसांनी ८ जुलै रोजी कात्रज चौकातील नवीन उड्डाणपुलाखाली प्रशांत सुरेश सावंत (वय ३८, रा. येरवडा) याला अटक केली होती. त्याच्याकडून २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन, मोबाईल आणि इतर मुद्देमालासह एकूण ५ कोटी ७९ लाख १० हजार २५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

चौकशीदरम्यान प्रशांत सावंत याने दिल्लीत वास्तव्यास असलेल्या ‘बेनी’ नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हा अमली पदार्थांचा साठा आणल्याची कबुली दिली. तिच्या निर्देशानुसार तो हा साठा बंगळुरूला पोहोचवण्यासाठी निघाला होता. मात्र, त्याआधीच पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रज येथे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी पोलीस हवालदार अतुल क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. तपासादरम्यान या गुन्ह्याचे धागेदोरे आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी जोडले गेले असल्याने आरोपीला सोबत घेऊन दिल्ली आणि बंगळुरू येथे तपास करण्याची आवश्यकता असल्याचे सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले.

सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. अमर ननावरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या ‘बेनी’ या नायजेरियन महिलेचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची पथके दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!