तीन स्टार खांद्यावर, पण पैशांचा मोह आवरला नाही! चाकणच्या पोलीस अधिकाऱ्याचं ‘नको ते’ कांड; 10 लाखांच्या लाचप्रकरणी ACBची कारवाई

पुणे : चाकण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी शिवाजी कदम यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. जमिनीसंबंधी आलेला तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी त्यांनी सुरुवातीला १० लाख रुपयांची लाच मागितली आणि तडजोडीनंतर ५ लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पुणे परिसरात जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या आणि त्यांच्या मुलाविरोधात चाकण उत्तर पोलीस ठाण्यात दोन तक्रार अर्ज दाखल झाले होते. या अर्जांची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कदम यांच्याकडे सोपवण्यात आली होती.
तपासादरम्यान, संबंधित अर्ज वरिष्ठांकडे दिवाणी स्वरूपाचे असल्याचे सांगून निकाली काढण्याचे आश्वासन देत कदम यांनी १० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत थेट पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली असता, तडजोडीनंतर ५ लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास कदम यांनी संमती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, अडीच लाख रुपये पहिल्या हप्त्यात आणि उर्वरित अडीच लाख रुपये काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते.

या प्रकरणात लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तानाजी कदम यांच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
जबाबदारीच्या पदावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावरच लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलासह नागरिकांमध्येही आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.