‘आज कुठे गेली होतीस?’ पत्नीवर संशय घेत पतीने ठेवले स्टेटस; अन् भर पावसात केलेल्या कृत्याने कोल्हापूर हादरलं

कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पेठवडगाव येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हल्ल्यापूर्वी आरोपी पतीने व्हॉट्सॲपवर ठेवलेल्या स्टेटसमुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

मृत महिलेचे नाव अमृता दीपक कांबळे (वय 29, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) असे असून, आरोपी पती दीपक लाडू कांबळे (वय 34) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक आणि अमृता यांचा 2016 मध्ये आंतरजातीय विवाह झाला होता. मात्र, दीपक हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.

बुधवारी दुपारी अमृता पेठवडगाव एसटी स्टँड परिसरात वकिलांना भेटण्यासाठी आली होती. याची माहिती मिळताच दीपक तेथे पोहोचला. त्याने अमृताला जाब विचारत वाद घातला. यावेळी अमृताने मुलांची शपथ घेत संशय घेऊ नको, अशी विनंती केली. मात्र, संतापलेल्या दीपकने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला केला.

हल्ल्यात अमृताच्या हातावर आणि मानेवर गंभीर वार झाले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा जागीच मृत्यू झाला.
हत्येपूर्वी ठेवले होते धक्कादायक स्टेटस
या घटनेतील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी दीपकने दुपारी दोनच्या सुमारास व्हॉट्सॲपवर ‘आज माझा तरी शेवट नाही तर… पुढच्याचा’ अशा आशयाचे स्टेटस ठेवले होते. त्यानंतर काही तासांतच त्याने पत्नीवर हल्ला केल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हत्येत वापरलेले शस्त्र जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. या घटनेमुळे अमृताच्या दोन लहान मुली आईविना पोरक्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.