कर्जमाफीला विलंब का? 5 जुलैची मुदत हुकल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली मोठी अपडेट


इंदापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची 5 जुलैपर्यंत प्रतीक्षा करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. यापूर्वी 30 जूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 5 जुलैपर्यंत रक्कम खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, ही मुदतही उलटल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत लवकरच कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे आश्वासन दिले.

इंदापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना भरणे म्हणाले की, सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून पुरवणी मागण्यांना मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर राज्यपालांची मंजुरी मिळताच कर्जमाफीचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही दिवस संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कर्जमाफीला विलंब झाल्याचे मान्य करताना भरणे म्हणाले, “चार-दोन दिवस उशीर झाला आहे, हे आम्ही मान्य करतो. मात्र, कोणताही अपात्र लाभार्थी योजनेत येऊ नये आणि पात्र शेतकरी वंचित राहू नयेत, यासाठी सर्व माहितीची पडताळणी केली जात आहे. कोणतीही चूक होऊ नये म्हणूनच सरकार खबरदारी घेत आहे.”

दरम्यान, कर्जमाफीच्या निकषांवर विरोधकांनी आक्षेप घेत सरकारवर जाचक अटी लादल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा दावा करत विविध ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र, सरकारने या सर्व आरोपांचे खंडन करत योजना पारदर्शक पद्धतीने राबवली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने घेतल्याचे सांगत दत्तात्रय भरणे यांनी येत्या काही दिवसांत कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असा पुनरुच्चार केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!