पुढील 3 तास अत्यंत महत्त्वाचे! मुंबई-ठाणे-रायगडला IMDचा रेड अलर्ट; मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांचा इशारा

मुंबई : राज्यात पावसाचा जोर कायम असतानाच भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरातील रोल्टा जंक्शन, सीप्झ परिसर आणि जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर वाहतुकीचा वेग मंदावला असून काही ठिकाणी रस्ते खचल्याच्या आणि झाडे कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यात डोंबिवली रेल्वे स्थानक परिसर जलमय झाला असून अनेक दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. मुंब्रा येथील अमृतनगर भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून गेल्या सहा तासांत 88.84 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. भेरव-खुरावले फाटा येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने महागाव, वाघोशी, भेरव आणि ताडगाव या गावांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने 6 जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवत नागरिकांना नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे, जलमय रस्त्यांवरून प्रवास टाळण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.