सात वर्षांचा प्रेमविवाह अन् संसारात तिसऱ्याची एन्ट्री; पुण्यात विवाहितेने संपवलं आयुष्य, मोबाईलमधील नोटने उलगडलं रहस्य


पुणे : पुण्यात एका २५ वर्षीय विवाहितेने पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत्यूपूर्वी तिने मोबाईलमधील ‘Keep Notes’ ॲपमध्ये लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, त्याआधारे पतीला अटक करण्यात आली आहे. तर त्याच्या कथित प्रेयसीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विवाहितेचे नाव वृषाली भीमराव आरडे उर्फ वृषाली रोहित घोडे (वय २५) असे आहे. याप्रकरणी तिचे पती रोहित मच्छिंद्र घोडे आणि त्याची कथित प्रेयसी तृप्ती वाकचौरे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषालीच्या आई लक्ष्मी आरडे (रा. इंदापूर) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृषाली आणि रोहित यांनी सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. बारामतीत काही काळ वास्तव्यानंतर ते पुण्यातील उरुळी देवाची परिसरातील वैष्णव सिटी येथे राहत होते. रोहित हा एका नामांकित डी-मार्टमध्ये नोकरी करत होता. त्याच ठिकाणी काम करणाऱ्या तृप्ती वाकचौरे हिच्याशी त्याचे कथित प्रेमसंबंध जुळल्याचे समोर आले आहे.

या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. या मानसिक तणावातूनच वृषालीने २७ जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

घटनेनंतर वृषालीचा मोबाईल तपासताना तिच्या भावाला ‘Keep Notes’ ॲपमध्ये लिहिलेली सुसाईड नोट आढळली. या नोटमध्ये आपल्या मृत्यूस पती रोहित घोडे आणि त्याचे तृप्ती वाकचौरे हिच्यासोबत असलेले कथित संबंध कारणीभूत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच दोघांकडून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचाही दावा नोटमध्ये करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या डिजिटल सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी रोहित घोडे याला अटक केली असून, तृप्ती वाकचौरे हिचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!