पुस्तकांच्या नावाखाली पालकांची लूट? CBSEसह खासगी शाळांवर सरकारचा मोठा चाबूक; समिती स्थापन, कारवाईचे संकेत

मुंबई : राज्यातील खासगी आणि CBSE संलग्न शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेतून किंवा ठराविक दुकानातूनच पुस्तके, वह्या आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडून पालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींवर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाईचे संकेत सरकारने दिले आहेत.

विधानसभेत या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही शाळेला पालकांना विशिष्ट दुकानातून पुस्तके किंवा साहित्य खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही. अशा तक्रारी प्राप्त झाल्यास शालेय शिक्षण विभाग चौकशी करून संबंधित संस्थांवर नियमानुसार कारवाई करेल. काही शाळांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अशा प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ही समिती पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन तपास करणार असून, दोषी शाळांविरोधात कठोर कारवाईची शिफारस करणार आहे.

दरम्यान, याच चर्चेदरम्यान दहावी-बारावी बोर्ड परीक्षांतील गैरप्रकारांचाही मुद्दा उपस्थित झाला. यंदा सामूहिक कॉपी आणि इतर गैरप्रकारांमुळे राज्यभरातील 100 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बारावी परीक्षेदरम्यान 15 गुन्हे दाखल झाले असून, एकूण 1,469 सामूहिक कॉपीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे शाळांकडून होणाऱ्या मनमानीला आळा बसण्याची आणि पालकांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.