उभा चेहरा, अंगावर काळा बुरखा… एकाच शाळेतील 4 विद्यार्थिनी अचानक बेपत्ता; महाराष्ट्रात खळबळ

ठाणे : महाराष्ट्रात खळबळ उडवणारी घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये समोर आली आहे. एका नामांकित उर्दू हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच दिवशी बेपत्ता झाल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. 29 जून रोजी सकाळी या चौघीही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घरातून निघाल्या होत्या. सीसीटीव्हीमध्ये त्या उभा चेहरा ठेवून अंगावर काळ्या रंगाचा बुरखा परिधान करून जाताना दिसत आहेत. मात्र, त्या शाळेत पोहोचल्याची नोंद नाही आणि संध्याकाळीही त्या घरी परतल्या नाहीत.

कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरात शोध घेतल्यानंतर रात्री उशिरा बाजारपेठ पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. शाळा परिसर, रेल्वे स्थानक, बसस्थानके आणि प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, मुलींचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) आणि इतर तांत्रिक पुराव्यांचीही छाननी सुरू आहे.
या प्रकरणासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून, राज्यातील विविध भागांत शोधमोहीम राबवली जात आहे. मुली स्वतःहून घर सोडून गेल्या की कोणीतरी त्यांना फूस लावून नेले, अथवा अपहरणाचा प्रकार आहे का, या सर्व शक्यतांचा तपास पोलिस करत आहेत. कोणतीही शक्यता अद्याप फेटाळण्यात आलेली नाही.

एकाच शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाचवेळी बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, या विद्यार्थिनींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या सुरक्षित शोधासाठी पोलिसांची शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे.
