‘ऑफर आली तर नक्की विचार करेन’; अमोल कोल्हेंच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ, पण पवारांवरील निष्ठाही केली स्पष्ट


पुणे : राज्यात सुरू असलेल्या पक्षांतराच्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे खासदार अमोल कोल्हे यांच्या एका वक्तव्याने नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. “आतापर्यंत मला कोणतीही पक्षांतराची ऑफर आलेली नाही. मात्र भविष्यात अशी ऑफर आली तर त्यावर विचार करेन,” असे विधान त्यांनी केले. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.

कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत सुविधांवरील कामाचे कौतुक करत, एखाद्या मराठी नेत्याचे राष्ट्रीय स्तरावर ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून नाव घेतले जात असेल, तर ती महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून चांगल्या कामाचे कौतुक करण्यात गैर काहीच नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचाही मुद्दा उपस्थित केला. काही लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलल्यासच प्रकल्पाला गती मिळेल, अशी चर्चा होत असेल तर हा विकासाचा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षातील आमदार-खासदारांना निधी मिळण्यात अडचणी येत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शरद पवार गटातील खासदार पक्षांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चांनाही कोल्हेंनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. “पवारसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण,” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर आपली ठाम निष्ठा व्यक्त केली. पक्षातील खासदार फुटीच्या चर्चा केवळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हे यांच्या एका बाजूला ऑफरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवारांप्रती व्यक्त केलेल्या निष्ठेमुळे राज्यातील राजकीय वातावरणात नव्या चर्चांना चालना मिळाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!