तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी नवीन नियम लागू! VIP दर्शन बंद, जाणून घ्या सविस्तर


धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरातील VIP आणि सशुल्क दर्शन व्यवस्था कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही भाविकाला विशेष प्राधान्य मिळणार नसून सर्वांना समान पद्धतीने एकाच रांगेतून देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.

मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या विशेष दर्शन व्यवस्थेला पूर्णविराम मिळाला आहे. याआधी 200 रुपये आणि 500 रुपये शुल्क भरून स्वतंत्र मार्गाने देवीचे जवळून दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध होती. मात्र या व्यवस्थेमुळे सर्वसामान्य भाविकांना तासन्‌तास रांगेत थांबावे लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या.

विशेषतः नवरात्रोत्सव, पौर्णिमा, सुट्ट्या आणि इतर धार्मिक उत्सवांच्या काळात VIP दर्शनामुळे सामान्य रांगेतील भाविकांचा मोठा खोळंबा होत असल्याचे निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टने समान दर्शन व्यवस्था लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नव्या नियमांनुसार, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला एकाच रांगेतून आणि समान अंतरावरून दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे दर्शन प्रक्रियेत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, तसेच श्रीमंत आणि सर्वसामान्य असा भेदभावही संपुष्टात येईल, अशी भावना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की दर्शन व्यवस्थेत बदल करण्यात आला असला तरी विविध धार्मिक पूजा, अभिषेक आणि इतर सेवा पूर्ववत सुरू राहणार आहेत. या निर्णयाचे राज्यभरातील भाविकांकडून स्वागत होत असून, तुळजाभवानीच्या दरबारात आता सर्वांना समान वागणूक मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!