लग्नाच्या अवघ्या ४८ दिवसांत संसाराचा अंत; हुंड्याच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या, डॉक्टर पती अटकेत


अंबरनाथ : अंबरनाथ शहरात हुंडाबळीची धक्कादायक घटना समोर आली असून, लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच एका २६ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशाखा टिळेकर (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पती डॉ. नितीन टिळेकर याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० एप्रिल २०२६ रोजी विशाखाचा विवाह अंबरनाथमधील डॉक्टर नितीन टिळेकर याच्याशी मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस सुरळीत गेले असले तरी नंतर तिच्यावर आर्थिक मागण्यांचा दबाव वाढत गेला. माहेरून अधिक पैसे आणि दागिने आणावेत, यासाठी तिचा सातत्याने मानसिक छळ करण्यात येत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विशाखाच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. घरात आणि घराबाहेर सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली होती. शेजाऱ्यांशी बोलणे, नातेवाईकांशी संपर्क ठेवणे किंवा माहेरच्या लोकांशी संवाद साधणे यावरही निर्बंध घालण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या वातावरणामुळे विशाखा मानसिकदृष्ट्या खचत गेल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

घटनेच्या काही तासांपूर्वी विशाखाने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती. तिची समजूत काढण्यासाठी आणि तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी आई-वडील रवाना झाले होते. मात्र ते पोहोचण्यापूर्वीच विशाखाने राहत्या घरात गळफास घेतल्याचे समोर आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.

विशाखाच्या वडिलांनी तसेच अन्य नातेवाईकांनी संबंधितांवर गंभीर आरोप करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने अंबरनाथ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात हुंड्यासाठी छळ, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सासरच्या इतर व्यक्तींचा सहभाग होता का, याचाही तपास सुरू असून पोलिसांकडून विविध पुरावे आणि जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!