बाहेरून दिसायचं साधंसुधं हॉटेल, आत परदेशी तरुणी अन् मोठं कांड; पुण्यातील शिवाजीनगर परिसरात पोलिसांचा छापा

पुणे : पुणे शहरात अनैतिक मानवी वाहतूक आणि देहविक्रीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्री रॅकेटचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात परदेशी तरुणीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी दोन दलालांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये काही महिलांना देहविक्रीसाठी आणले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. खात्री पटताच विशेष पथकाने संबंधित हॉटेलवर अचानक धाड टाकली.
कारवाईदरम्यान हॉटेलमधून तीन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी संबंधित महिलांना सुरक्षित ताब्यात घेतले असून त्यांना आवश्यक मदत व समुपदेशन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणात दोन संशयित दलालांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या नेटवर्कबाबत तपास सुरू आहे. या रॅकेटचे धागेदोरे इतर शहरांशी किंवा राज्यांशी जोडलेले आहेत का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

दरम्यान, शहरातील हॉटेल्स, लॉज आणि इतर ठिकाणी सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर कारवायांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारचे रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.