धक्कादायक! उंदराचं औषध डब्यात ठेवलं, चिमुरडीला तीन वेळा हार्ट अटॅक, घरात वास पसरला अन्…

मुंबई : काही दिवसांपूर्वी कलिंगडातून झालेल्या विषबाधेच्या घटनेने राज्य हादरले असतानाच आता मुंबईत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गिरगाव येथील अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीला तांदळाच्या डब्यात ठेवलेल्या विषारी कीटकनाशकाच्या प्रभावामुळे गंभीर विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उंदीर आणि किडींपासून संरक्षणासाठी तांदळाच्या डब्यात ठेवण्यात आलेल्या ‘ॲल्युमिनियम फॉस्फाइड’ या अत्यंत घातक रसायनाच्या वाफांचा परिणाम झाल्याने चिमुरडीची प्रकृती गंभीर झाली. तिला अवघ्या 15 तासांत तीन वेळा हृदयविकाराचा झटका आला असून सध्या तिच्यावर मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
घटनेपूर्वी दोन दिवस मुलीला उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. तिच्या मोठ्या बहिणीलाही अशीच लक्षणे दिसून आली होती. मात्र, उपचारानंतर ती बरी झाली. दरम्यान, घरातील तांदळाच्या साठवणुकीत ॲल्युमिनियम फॉस्फाइडच्या गोळ्या ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, ॲल्युमिनियम फॉस्फाइड हे अत्यंत घातक रसायन असून त्याच्या अल्प प्रमाणातील संपर्कामुळेही गंभीर विषबाधा होऊ शकते. या रसायनामुळे श्वास घेण्यास त्रास, उलट्या, जुलाब, किडनी निकामी होणे आणि हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

सध्या संबंधित चिमुरडीवर प्रगत वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून तज्ज्ञांनी नागरिकांना अशा विषारी पदार्थांचा वापर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.