सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका; शुभम धुमाळला अटक


लोणी काळभोर, ता. १६ : हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथून बेपत्ता झालेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या प्रकरणाचा अवघ्या दहा दिवसांत तपास करून लोणी काळभोर पोलिसांनी तिला तडीपार सराईत गुन्हेगाराच्या तावडीतून सोडवले आहे. शेवाळवाडी परिसरातील एका लॉजवर सोमवार (१५ जून) रोजी मध्यरात्री छापा टाकत त्याला अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी शुभम संजय धुमाळ (वय २६, रा. धुमाळ मळा, म्हस्कोबा मंदिराजवळ, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आळंदी म्हातोबाची येथील १६ वर्षीय मुलगी घरात सर्व सदस्य उपस्थित असताना शुक्रवार (५ जून) रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली. मुलगी बराच वेळ घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांकडे चौकशी करूनही तिचा तपास न लागल्याने अखेर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही शुभम धुमाळ याने तिच्या अल्पवयीनपणाचा गैरफायदा घेत तिला पालकांच्या कायदेशीर ताब्यातून फूस लावून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी विविध गुन्हे दाखल असून, त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती. मात्र, कायद्याचा धाक न बाळगता तो पुन्हा परिसरात सक्रिय झाल्याचे तपासात समोर आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे यांचा वापर करून तपास सुरू करण्यात आला. पोलीस हवालदार अण्णा माने आणि पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांना एका खबऱ्यामार्फत शुभम हा नाव बदलून शेवाळवाडी (ता. हवेली) येथील एका लॉजमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचून छापा टाकला असता, शुभम आणि अल्पवयीन मुलगी एकत्र आढळून आले. पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेत मुलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या शुभम धुमाळ याला मंगळवार (१६ जून) रोजी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपीला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवालदार अण्णा माने, पोलीस अंमलदार सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!