राष्ट्रवादीत मोठी संघटनात्मक फेरबदलाची तयारी; रुपाली चाकणकरांची रिप्लेसमेंट सापडली? रात्री उशीरा ‘देवगिरी’वर…


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदलांना वेग आला असून पक्षातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नव्या नियुक्त्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाच्या रिक्त पदांबाबत आणि फेरनियुक्त्यांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महिला, युवक, विद्यार्थी आणि युवती आघाड्यांमधील नेतृत्व बदलांवर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले पद म्हणजे महिला प्रदेशाध्यक्षपद. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर निर्माण झालेल्या वादामुळे माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर हे पद रिक्त असून आता या पदासाठी पुणे जिल्ह्यातील सक्रिय नेत्या वैशाली नागवडे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगली आहे.

वैशाली नागवडे या सध्या पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या म्हणून काम पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली आहे. दौंड तालुक्यातील राजकारणात त्यांचा प्रभाव मानला जातो. त्यांनी २०१७ आणि २०२० च्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही पक्षाकडून उमेदवारी स्वीकारून सक्रिय राजकीय सहभाग नोंदवला होता.

राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार अनुभवलेल्या नागवडे २०२२ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेत अधिक सक्रिय भूमिका बजावत नेतृत्वापर्यंत आपली छाप निर्माण केली. त्यामुळे महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव गांभीर्याने घेतले जात असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, पक्षाच्या युवक आणि विद्यार्थी संघटनांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे. युवक प्रदेशाध्यक्षपदासाठी निखिल ठाकरे, तर विद्यार्थी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी आकाश झांबरे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक पुनर्बांधणीचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असून येत्या काही दिवसांत पक्षाकडून मोठ्या नियुक्त्यांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!