महायुती सरकारची मोठी घोषणा! कमी दरात मिळणार ‘देवाभाऊ टॅक्सी’ सेवा; ओला-उबेरला मोठे आव्हान

मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश परिसरातील प्रवाशांसाठी लवकरच आणखी एक नवीन टॅक्सी पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. खासगी ॲप-आधारित टॅक्सी सेवांना पर्याय म्हणून राज्यात ‘देवाभाऊ सहकार टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ सेवा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना कमी दरात प्रवासाची सुविधा मिळेल, तर चालक आणि वाहन मालकांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खासगी ॲप कंपन्यांना पर्याय…
भारतीय जनता पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या नव्या उपक्रमाबाबत माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ओला, उबेर आणि रॅपिडोसारख्या ॲप-आधारित टॅक्सी कंपन्या चालकांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन आकारतात. यामुळे वाहन चालक आणि मालकांच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याने सहकार तत्त्वावर आधारित नवीन टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्ली आणि कोलकाता येथे सरकारी पाठबळ असलेल्या टॅक्सी सेवांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्रातही त्याच धर्तीवर ‘देवाभाऊ टॅक्सी’ आणि ‘छावा टॅक्सी’ अॅप सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.

प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या भारत टॅक्सी मॉडेलमुळे चालक आणि वाहन मालकांना अधिक आर्थिक लाभ मिळाला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही खासगी कंपन्यांच्या जादा कमिशनला पर्याय उभा केला जाणार आहे.

या प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याची माहितीही समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बैठक घेऊन या योजनेला हिरवा कंदील दिला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आवश्यक धोरणात्मक बाबी निश्चित केल्या आहेत. तसेच या सेवेसाठी आवश्यक नियमावली तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या टॅक्सी सेवेची सुरुवात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 2 हजार ते 5 हजार टॅक्सी रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वाढती प्रवासी संख्या आणि ॲप-आधारित सेवांवरील अवलंबित्व लक्षात घेता हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.
या नव्या व्यवस्थेमुळे चालकांना कमिशनच्या ओझ्यातून दिलासा मिळू शकतो, तर प्रवाशांना परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. भविष्यात या सेवेचा विस्तार राज्यातील इतर शहरांमध्येही केला जाऊ शकतो.