राज्याच्या राजकारणात खळबळ! शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? तारीखही चर्चेत, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्याबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विरोधकांची ताकद वाढवण्यासाठी आणि आगामी राजकीय समीकरणे लक्षात घेऊन काँग्रेसकडून हा प्रस्ताव पुढे करण्यात आल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रस्तावाबाबत दोन्ही पक्षांच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये पडद्यामागे चर्चा सुरू असून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटातील एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या बैठकीबाबत दोन्ही पक्षांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी काँग्रेसची विचारधारा मानणाऱ्या सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे, अशी भूमिका मांडली होती. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, “संजय राऊत हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या मताचा मी आदर करते. मात्र हे प्रत्यक्षात कधी आणि कसे घडेल, हे येणारा काळच ठरवेल,” असे म्हटले.

सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चेला आणखी वेग आला आहे. मात्र या सर्व चर्चांबाबत दोन्ही पक्षांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसून, पुढील काही महिन्यांत याबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.