तळेगाव एमआयडीसी हादरली! CO₂ गॅस गळतीचा थरार – दोन कामगारांचा जागीच मृत्यू, तिघे मृत्यूशी झुंज देत आहेत

पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसी परिसरात सोमवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. नवलाख उंबरे येथील शॅफ्लर इंडिया कंपनीत कार्बन डायऑक्साइड (CO₂) गॅसची गळती होऊन दोन कामगारांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सुरुवातीला घटनास्थळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र प्राथमिक तपासानंतर स्पष्ट झाले की कंपनीत कोणताही स्फोट झाला नसून CO₂ गॅस गळतीच या दुर्घटनेचे मुख्य कारण ठरले आहे. गॅसचा अचानक झालेला प्रचंड लीक आणि गुदमरवणारी स्थिती यामुळे कामगारांना सावरण्याची संधीच मिळाली नाही, असे प्राथमिक अंदाज आहेत.
या दुर्घटनेत गणेश उंबरे आणि वैभव थोरात या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील हे तीन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसर सुरक्षा कारणास्तव सील करण्यात आला असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा सखोल तपास सुरू असून तांत्रिक पथकांकडून पाहणी केली जात आहे.

या दुर्घटनेनंतर तळेगाव एमआयडीसी परिसरात मोठी खळबळ उडाली असून औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. कामगार वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.