साखरपुड्याच्या 5 दिवस आधी घरात झाला ‘कौटुंबिक भूकंप’! मुलीची आई प्रियकरासोबत पळाली; WhatsApp Status मुळे उघड झालं गुपित

जळगाव : घरभर साखरपुड्याची लगबग, पाहुण्यांच्या याद्या, खरेदीची धावपळ आणि मुलीच्या नव्या आयुष्याची स्वप्ने रंगत असतानाच एका घटनेने संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का दिला. मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर आला असताना तिची आईच प्रियकरासोबत घरातून निघून गेली आणि थेट लग्न केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये समोर आली आहे. विशेष म्हणजे, हे गुपित फार काळ लपून राहिले नाही. एका WhatsApp Status ने संपूर्ण प्रकरणाची वाच्यता केली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

माहितीनुसार, जामनेरमधील एका कुटुंबात मुलीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र ऐनवेळी संबंधित महिलेने कोणालाही कल्पना न देता घर सोडले. सुरुवातीला कुटुंबीयांना तिचा ठावठिकाणा मिळत नव्हता. काही वेळानंतर ती आपल्या प्रियकरासोबत गेल्याची माहिती समोर आली.
दरम्यान, या दोघांनी लग्न केल्याचे फोटो महिलेच्या प्रियकराने WhatsApp Status वर अपलोड केले. नातेवाईक आणि परिचितांनी ते फोटो पाहताच बातमी वाऱ्यासारखी पसरली. काही क्षणांतच ही बाब कुटुंबीयांपर्यंत पोहोचली आणि ज्या घरात साखरपुड्याची तयारी सुरू होती, तिथे चिंतेचे आणि धक्क्याचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेमुळे समाजात बदनामी होत असल्याची भावना व्यक्त करत महिलेच्या पतीने थेट जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीचा साखरपुडा काही दिवसांवर असताना सोशल मीडियावरील फोटो हटवावेत, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला बोलावून घेत समज दिली. त्यानंतर WhatsApp Status हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जरी सोशल मीडियावरील फोटो हटवले गेले असले तरी या घटनेची चर्चा आता संपूर्ण जळगाव जिल्ह्यात रंगली असून, साखरपुड्याच्या घरात अचानक आलेल्या या वादळाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.