पाटस गोळीबार प्रकरणाला नवे वळण! 18 जणांवर गुन्हे दाखल, 10 आरोपी अटकेत; माजी सरपंचांचे ट्रान्सपोर्ट ऑफिस वादाच्या केंद्रस्थानी?


दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथे सिमेंट वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या लोडिंगच्या वादातून भरदिवसा झालेल्या हाणामारी आणि गोळीबार प्रकरणात यवत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांतील एकूण 18 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी (5 जून) दुपारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लक्ष्मी बापू गरदडे कॉम्प्लेक्ससमोर हा थरार घडला. श्री सिमेंट कंपनीत ट्रक भरण्याच्या वादातून “कडू गट” आणि “कुऱ्हाडकर गट” आमनेसामने आले. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच तो विकोपाला गेला. दोन्ही गटांनी लोखंडी गज आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला केला. त्यानंतर गावठी पिस्तुलातून हवेत तीन राऊंड गोळीबार करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस, पाटस पोलीस आणि ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने संयुक्त कारवाई करत आरोपींचा शोध सुरू केला. काही आरोपींना उसाच्या शेतातून आणि विविध ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले. दोन्ही गटांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 18 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ज्या कॉम्प्लेक्ससमोर हा प्रकार घडला, त्याच ठिकाणी सिमेंट वाहतुकीशी संबंधित कार्यालय असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वादामागे ट्रान्सपोर्ट व्यवसायातील स्पर्धा, ठेकेदारी आणि स्थानिक गटांचे वर्चस्व यांचा संबंध आहे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

ग्रामस्थांकडून या प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी होत असून, गोळीबारामागील खरे सूत्रधार कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोल्हे करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!