सलून सेवांनाही महागाईचा तडाखा; केस कापणे-दाढी 20% महाग, नागरिकांना बसणार थेट झळ


पुणे : राज्यात वाढत्या महागाईचा परिणाम आता थेट सलून सेवांवरही दिसू लागला आहे. केस कापणे, दाढी करणे आणि इतर सलून सेवांच्या दरांमध्ये 20 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र नाभिक महामंडळाने घेतला असून हा निर्णय 6 जून 2026 पासून राज्यभर लागू करण्यात आला आहे.

वाढते इंधन दर, कॉस्मेटिक साहित्याच्या किमती, वीजबिल, दुकानभाडे तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली वाढ यामुळे सलून व्यवसायावर मोठा आर्थिक ताण आला असल्याचे सांगण्यात आले आहे. व्यवसाय टिकवण्यासाठी दरवाढ आवश्यक असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.

नवीन दरांनुसार साध्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी सुमारे 150 रुपये तर दाढीसाठी 100 रुपये मोजावे लागणार आहेत. ग्रामीण भागात केस कापण्याचे दर 80 ते 100 रुपये दरम्यान राहणार आहेत. तर प्रीमियम सलूनमध्ये हे दर 500 ते 1000 रुपयांपर्यंत पोहोचतील. दाढीचे शुल्कही 50 ते 500 रुपयांपर्यंत आकारले जाणार आहे.

महामंडळाने स्पष्ट केले आहे की ही दरवाढ नफा कमावण्यासाठी नसून सलून व्यावसायिकांचे आर्थिक अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक आहे. वाढत्या खर्चामुळे व्यवसाय चालवणे कठीण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. आधीच इंधन, गॅस, अन्नधान्य आणि इतर दैनंदिन वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांवर आता सलून सेवांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. अनेकांनी या दरवाढीला विरोध दर्शवत दर स्थिर ठेवण्याची मागणी केली आहे.

राज्यातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सलून सेवांवरील ही दरवाढ चर्चेचा विषय ठरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!