पुण्यात संतापजनक प्रकार! १२ वर्षांच्या मुलीला कॅफेत बोलावून अत्याचार, आक्षेपार्ह फोटोही केले व्हायरल; कॅफे मालकासह तिघांना बेड्या

तळेगाव दाभाडे : पुण्यातून पुन्हा एकदा महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. तळेगाव दाभाडे परिसरातील एका प्रसिद्ध कॅफेत १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. इतकेच नव्हे तर, अत्याचारानंतर नराधमांनी पीडितेचे आक्षेपार्ह (न्यूड) फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन अल्पवयीन मुलांसह एका कॅफे मालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर आपले आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याचे समजताच पीडित १२ वर्षीय मुलगी प्रचंड घाबरली होती. तिने हिंमत करून आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आईसोबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात जाऊन तिने प्राथमिक तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुरुवातीला फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. मात्र, जेव्हा पोलिसांनी पीडित मुलीची विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली, तेव्हा या प्रकरणातील काळी बाजू समोर आली आणि पोलीसही चक्रावून गेले.
काही दिवसांपूर्वी पीडितेच्या एका ओळखीच्या मुलाने तिला तळेगावमधील ‘कोजी कॅफे’ (Cozy Cafe) येथे भेटायला बोलावले होते. या कॅफेमधील एका खोलीत नेऊन त्या मुलाने तिच्यावर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस तपासात या कॅफेबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कॅफेमध्ये अशा प्रकारची अनैतिक आणि बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी स्वतंत्र जागा दिली जात होती आणि कॅफे मालक स्वतः पैशांच्या हव्यासापोटी या प्रकारांना मुभा देत होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

या घटनेचे गांभीर्य ओळखून तळेगाव दाभाडे पोलिसांनी चक्र फिरवली. ‘कोजी कॅफे’चा मालक (शिंदे) याला पोलिसांनी मुख्य आरोपीला मदत आणि अनैतिक कृत्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकाने तात्काळ अटक केली आहे. तसेच पीडितेवर अत्याचार करणाऱ्या आणि तिचे फोटो सोशल मीडियावर पसरवणाऱ्या दोन्ही विधीसंघर्षित बालकांना (अल्पवयीन मुले) पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

“बारा वर्षांच्या पीडित बालिकेच्या तक्रारीवरून दोन अल्पवयीन मुलांसह कॅफे मालकावर पॉक्सो (POCSO) आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. संबंधित कॅफेमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना अशा कृत्यांसाठी जागा दिली जात असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यानुसार कॅफे मालक शिंदे याच्यावर कडक कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.”
तळेगाव दाभाडे सारख्या गजबजलेल्या भागात, दिवसाढवळ्या एका कॅफेमध्ये असा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि तीव्र संतापाचे वातावरण आहे. शहरात आणि उपनगरात ‘कॅफे संस्कृती’च्या नावाखाली अनेक ठिकाणी अशा अवैध गोष्टी चालत असून, पोलिसांनी अशा सर्व कॅफेवर कडक नजर ठेवून ते कायमचे बंद करावेत, अशी मागणी आता पालकांकडून केली जात आहे.