लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये ‘या’ तारखेदरम्यान खात्यात जमा होणार; समोर आली मोठी माहिती…

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लाभार्थी महिलांमध्ये मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

नुकतेच राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचे मिळून 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले होते. मे महिन्याच्या 15 तारखेनंतर या रकमेचे वितरण सुरू झाले होते. मात्र, जून महिन्याचे सहा दिवस उलटूनही मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही.
महिला व बालविकास विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्याचा लाभ लवकरच वितरित होण्याची शक्यता आहे. 12 जून ते 15 जूनदरम्यान कोणत्याही दिवशी पात्र महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, ई-केवायसी मोहिमेनंतर या योजनेच्या लाभार्थी यादीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ई-केवायसी न करणे, निकष पूर्ण न होणे किंवा पडताळणीत आढळलेल्या त्रुटींमुळे सुमारे 80 लाख महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे सध्या या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 1 कोटी 66 लाखांवर आली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सरकारची असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भविष्यात पात्र महिलांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.