‘तू मला खूश ठेव, पैशांची चिंता करावी लागणार नाही’; पुण्यातील नामांकित कंपनीच्या मॅनेजरकडून महिलेचा लैंगिक छळ


पुणे : पुणे शहरातील एका नामांकित विमा कंपनीत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत वरिष्ठ अधिकाऱ्याने वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

तक्रारदार महिला ही विमा कंपनीच्या हिंजवडी आणि वाकड शाखांमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. जानेवारी 2026 मध्ये हिंजवडी शाखेत रुजू झाल्यानंतर एरिया मॅनेजरने कामाच्या निमित्ताने वारंवार संपर्क साधत वैयक्तिक जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे.

महिलेने बदलीबाबत चर्चा केल्यानंतर आरोपीने त्याचा गैरफायदा घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कामगिरीच्या आढाव्याच्या बहाण्याने कार्यालयात बोलावणे, त्यानंतर प्रवासादरम्यान अयोग्य वर्तन करणे तसेच नोकरी गमावण्याची भीती दाखवून दबाव टाकणे, असे प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी अधिकाऱ्याने वरिष्ठांना खुश ठेवण्याबाबत अयोग्य टिप्पणी करत महिलेशी अवमानकारक वर्तन केले. तसेच आर्थिक लाभांची आमिषे दाखवत शारीरिक जवळीक साधण्याचाही प्रयत्न केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले आहे.

सततच्या मानसिक त्रासामुळे अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी एरिया मॅनेजरविरुद्ध विनयभंग, धमकावणे आणि इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!