मोठी राजकीय घडामोड! संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?

मुंबई : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणणारी एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. दादर येथील शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी राऊत दाखल झाल्याने विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या भेटीमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी राज्यातील सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.
सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणुका सुरू आहेत. काही ठिकाणी महायुतीतील बंडखोरीमुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज सकाळी कोकणातील एका उमेदवाराच्या माघारीसाठी मोठ्या आर्थिक व्यवहाराचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.

दरम्यान, संजय राऊत यांना ठाकरे बंधूंमधील महत्त्वाचा दुवा मानले जाते. मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यावेळी करण्यात आला होता.

महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही ठाकरे बंधू अनेकदा एकत्र दिसले होते. शाखा भेटी, संयुक्त कार्यक्रम तसेच शिवतीर्थ आणि मातोश्रीवरील वाढलेल्या भेटीगाठींमुळे राजकीय आघाडीच्या चर्चांना वेग आला होता. मात्र निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांमधील हालचाली काहीशा मंदावल्या.
अशा परिस्थितीत विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेली संजय राऊत आणि राज ठाकरे यांची भेट नेमका कोणता राजकीय संदेश देणार, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.