पुण्यात मविआ बैठकीत मोठा तणाव; सुप्रिया सुळे समोर काँग्रेस नेत्यांची राष्ट्रवादीवर उघड नाराजी, नेमकं काय घडलं?

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एकजूट दाखवण्यासाठी काँग्रेस भवन येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत बाहेर एकजूट दिसत असली तरी आतमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शप) यांच्यातील तणाव पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बैठकीदरम्यान काही काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. मागील महापालिका निवडणुकीतील अनुभव, तसेच काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहिल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद अद्याप कायम असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
काही नगरसेवकांनी थेट प्रश्न उपस्थित करत महाविकास आघाडी असतानाही एकमेकांविरोधात उमेदवार का उभे केले गेले, भविष्यात पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची भूमिका काय असेल, असे सवाल केल्याचे समजते. या चर्चेमुळे बैठकीत काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याचीही माहिती आहे.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी एकजूट असून पुणेकरांच्या प्रश्नांसाठी एकत्र लढणार असल्याचे सांगितले. तर काँग्रेस शहराध्यक्षांनीही आघाडीतील एकोप्यावर भर दिला.

दरम्यान, काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यांनी पूर्वनियोजित धार्मिक यात्रेमुळे उपस्थित राहता आले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
बैठकीत शहरातील प्रलंबित प्रश्नांवर संयुक्तपणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 12 जून रोजी महाविकास आघाडीचे नेते पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. या वेळी विविध प्रश्नांवर एकत्रित भूमिका मांडली जाणार आहे.