लोणी काळभोर पोलिसांची मोठी कारवाई; दहशत माजवणारे चार सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती व कुंजीरवाडी परिसरात दहशत माजवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या चार सराईत गुन्हेगारांवर लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई करत तब्बल दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार केले आहे.

टोळी प्रमुख अब्दुल उर्फ अबु इरफान अन्सारी (वय.२४), टोळी सदस्य आकिब इकबाल अन्सारी, वय.२६, दोघे रा. इंदीरानगर, कदमवाकवस्ती, हवेली, जि.पुणे), टोळी सदस्य पियुष उर्फ युवराज गणेश भिसे (वय.२१ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, , लोणी काळभोर, ता. हवेली, जि.पुणे) व चाँद सरदार पठाण (वय. ५९ वर्षे. वायकरवस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि.पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. भांडणे, जिवे मारण्याचे प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणे, गंभीर दुखापत करणे, धमकावणे आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे विविध गंभीर गुन्हे या आरोपींच्या नावावर असल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार चारही आरोपी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या आरोपींनी वारंवार गुन्हे करून परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण केली होती. त्यांच्याविरोधात अनेकदा तक्रारी दाखल झाल्यानंतरही त्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती कायम असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. आरोपींच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी त्यांच्या गुन्हेगारी अभिलेखांचा सखोल अभ्यास केला. त्यानंतर संबंधित आरोपींना तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर करण्यात आला.

प्रस्तावातील पुरावे, गुन्हेगारी इतिहास आणि स्थानिक नागरिकांवर होणारा परिणाम याचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलमान्वये चारही आरोपींना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या कालावधीत संबंधित आरोपींना या हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आणखी कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याने अलिकडच्या काळात सराईत गुन्हेगारांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेचा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. परिसरातील शांतता, नागरिकांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या तडीपार कारवाईमुळे लोणी काळभोर परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा आळा बसेल आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, लोणी काळभोरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार विलास शिंदे, वैजिनाथ शेलार, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!