“१८ वर्षांचा राजकीय वाद अखेर संपला!”; रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरेंना मोठा दिलासा

ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात एकेकाळी प्रचंड गाजलेल्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणाचा अखेर आज निर्णायक शेवट झाला. तब्बल १८ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची ठाणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या निर्णयानंतर न्यायालय परिसरात मनसैनिकांनी जल्लोष केला, तर राज ठाकरे यांनीही स्मितहास्य करत प्रतिक्रिया दिल्याने वातावरणात उत्सुकता वाढली.

२००८ मध्ये रेल्वे भरती प्रक्रियेदरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या आंदोलनानंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आलं होतं. उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ले, तोडफोड आणि हिंसाचाराच्या आरोपांमुळे मनसे अडचणीत आली होती. या आंदोलनाला राज ठाकरे यांच्या भाषणातून चिथावणी मिळाल्याचा आरोप करत त्यांच्यासह काही मनसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाची सुनावणी अनेक वर्षे विविध न्यायालयांमध्ये सुरू होती. काहीवेळा आरोपी न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. मात्र, कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना दिलासा मिळाला. अखेर आज ठाणे सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देताना सरकारी पक्षाकडून ठोस पुरावे सादर करण्यात अपयश आल्याचे नमूद केले. आरोपींचा थेट सहभाग सिद्ध होत नसल्याने न्यायालयाने राज ठाकरे यांच्यासह इतर आरोपींना निर्दोष मुक्त केले.

सुनावणीदरम्यान राज ठाकरे यांनी आपण या हिंसाचाराशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले होते. आंदोलनाच्या वेळी आपण नाशिकमध्ये असल्याचेही त्यांनी न्यायालयात सांगितले होते. निकालानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, “राज ठाकरे यांना राजकीय हेतूने या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता,” असा आरोप केला.

न्यायालयातून बाहेर पडताना राज ठाकरे यांनी “अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी,” अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती समोर आली. निकालानंतर ठाणे न्यायालय परिसरात मनसैनिकांनी घोषणाबाजी करत आनंद साजरा केला. १८ वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा शेवट झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.