थरारक दृश्य! महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात, क्षणात आनंदाचं वातावरण शोकात बदललं; 12 जणांचा मृत्यू


पालघर : आनंदाचा प्रवास काही क्षणांतच मृत्यूच्या भयावह कहाणीत बदलला… मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. धानीवरी परिसरात वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रकचा कंटेनरला जोरदार धडक बसून झालेल्या या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या या ट्रकमध्ये 100 हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना अचानक समोर आलेल्या कंटेनरशी ट्रकची भीषण टक्कर झाली. धडक इतकी जोरदार होती की ट्रकचा पुढचा भाग अक्षरशः चिरडला गेला आणि आत बसलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. काही जण जागीच ठार झाले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर परिसरात आरडाओरडा आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही वेळातच पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आलं. जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

या दुर्घटनेनंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. क्रेनच्या मदतीने दोन्ही वाहने बाजूला हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून पोलिसांकडून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, एका क्षणात इतक्या मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. लग्नासाठी निघालेला आनंदाचा प्रवास अशा दुर्दैवी अपघातात संपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!