पवईत भीषण हिट अँड रन! भरधाव क्रेटाने ४ जणांना उडवलं; १९ वर्षीय चालक ताब्यात


मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी–विक्रोळी लिंक रोड (JVLR)वर रविवारी (३ मे) संध्याकाळी भीषण हिट अँड रनची घटना घडली. पवईतील महात्मा फुले नगरजवळ सायंकाळी सुमारे ७:१५ वाजता भरधाव ह्युंदाई क्रेटा कारने पादचाऱ्यांना उडवल्याने चार जण जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे मनिषा सावंत (४५), नाथ सोपान पारगावकर (४०), अम्माचार पांडे (४०) आणि धनुष पांडे (१३) अशी आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही ह्युंदाई क्रेटा कार JVLR मार्गावरून पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH)च्या दिशेने वेगाने जात होती. आपापटी मार्केट परिसर पार करताना कारने प्रथम एका मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर चालकाने नियंत्रण गमावल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पादचाऱ्यांमध्ये घुसली. धडक इतकी जबरदस्त होती की पादचारी दूरवर फेकले गेले. अपघातानंतर चालकाने जखमींना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत विशाल सिंधू (१९) या महाविद्यालयीन तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा (FIR) नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने मद्यप्राशन केले होते का, हे तपासण्यासाठी त्याचे रक्तनमुने घेतले असून अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पवई परिसरात भरधाव टेम्पोने तीन सफाई कामगारांना चिरडल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणातही चालक फरार झाला होता. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून JVLRसारख्या वर्दळीच्या मार्गांवर सुरक्षा उपाययोजना कडक करण्याची मागणी जोर धरत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!