गॅस दरवाढीचा स्फोट? घरगुती सिलिंडर 500 रुपयांनी महागणार असल्याची शक्यता!

मुंबई : देशात वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशावर पुन्हा मोठा भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि 5 किलोच्या सिलिंडरच्या दरात आधीच वाढ झाल्यानंतर आता घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 500 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, अशी सूत्रांची माहिती समोर येत आहे. ही वाढ लागू झाल्यास एका सिलिंडरसाठी सुमारे 1,400 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे.

तेल विपणन कंपन्यांना (OMCs) सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल आणि एलपीजीच्या वाढत्या दरांमुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी दरवाढीचा पर्याय केंद्र सरकारकडून गांभीर्याने विचारात घेतला जात असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, 4 मेनंतर कोणत्याही क्षणी घरगुती गॅस दरवाढीची घोषणा होऊ शकते.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्येही वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. वित्त मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय चर्चा सुरू असून, ऊर्जा क्षेत्रातील वाढता ताण पाहता इंधन दरवाढ टाळता येणार नाही, असे चित्र आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढून इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी 1 मेपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबईसारख्या शहरात एका सिलिंडरसाठी आता 3 हजार रुपयांहून अधिक किंमत मोजावी लागत आहे. त्याचबरोबर 5 किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या दरातही 261 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट फटका हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायाला बसत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम आशियातील तणावामुळे ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असून, घाऊक व किरकोळ डिझेल दरांतील मोठ्या फरकामुळे उद्योग क्षेत्रालाही आर्थिक ताण जाणवत आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या मते, सततच्या गॅस दरवाढीमुळे खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढू शकतात. त्यामुळे आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर आणखी आर्थिक बोजा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.