मे महिन्यात दिलासा! दिवसा तापमान कमी होणार, पण रात्री झोपेचा खोळंबा; मान्सूनबाबत संकेत

पुणे : राज्यात तापमानात सातत्याने वाढ होत असून नागरिक उष्णतेमुळे हैराण झाले आहेत. एप्रिलमधील भीषण उकाड्यानंतर मे महिन्यात मात्र नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, मे महिन्यात महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात कमाल तापमान सरासरीइतके किंवा त्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
मात्र, ढगाळ हवामानामुळे रात्रीच्या तापमानात वाढ होणार असून उकाडा वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. IMD चे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी वारे आणि दक्षिण भारतातील वादळी पावसाच्या प्रभावामुळे मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्य होऊ शकतो.

यामुळे दिवसाचे तापमान नियंत्रणात राहील, मात्र ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान वाढेल. परिणामी, रात्रीच्या वेळी उकाडा वाढून नागरिकांना अस्वस्थता जाणवू शकते. विदर्भ वगळता राज्यातील इतर बहुतांश भागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यातील हवामान संमिश्र राहण्याचा अंदाज आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहू शकते. तर धुळे, नंदुरबारपासून कोल्हापूर, सांगलीपर्यंतच्या मध्य महाराष्ट्र पट्ट्यात उष्णतेच्या लाटांचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.