कदमवाकवस्तीमध्ये थरार! विवाह समारंभातून परतणाऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल..

लोणी काळभोर : विवाह समारंभाला आलेल्या एका तरुणावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका परिसरात २० एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश सूर्यकांत पवार (वय २८, रा. हडपसर) यांच्या फिर्यादीवरून सुरेश बाबुराव गायकवाड (वय १८), कुणाल राहुल चौगुले (वय १८) आणि शुभम धर्मा सोलंकी (तिघे रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश पवार हे ऑनलाईन कुरिअर सेवा देऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते कवडीपाट टोलनाका परिसरातील एका विवाह समारंभासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री सुमारे १०.३० वाजता ते दुचाकीवरून निघाले असता त्यांच्या मागून नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरून तिघे आले.

आरोपींनी त्यांची गाडी अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर एकाने गच्ची पकडून कोयत्याने पाठीवर वार केला, तर दुसऱ्याने धारदार शस्त्राने डोक्यावर प्रहार केला. तिसऱ्याने डोळ्यांवर बुक्यांनी मारहाण केली. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

हल्ल्यानंतर आरोपींनी त्यांच्या दुचाकीचेही नुकसान करत घटनास्थळावरून पलायन केले. जखमी अवस्थेत आकाश यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात दाखल केले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांनी तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू आहे.