मुंबईत सेक्सटॉर्शनचा धक्का! महिला क्रिकेटर अटकेत; उद्योगपतीकडून 63 लाखांची उकळपट्टी…

मुंबई : सेक्सटॉर्शन आणि खंडणी उकळल्याच्या गंभीर प्रकरणात जम्मू-कश्मीरमधील महिला क्रिकेटर फरखंदा खान हिला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या कारवाईत तिचा भाऊ बाजिल खान यालाही ताब्यात घेण्यात आले असून, दोघांना नवी दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. या प्रकरणातील तिसरा आरोपी उद्दीन इम्तियाज वानी याला श्रीनगरमधून पकडण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कुलाबा परिसरातील व्यावसायिक असून त्याची ओळख २०२४ मध्ये फरखंदा खानसोबत झाली होती. सुरुवातीला मैत्री वाढल्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर आरोपींनी अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवून फिर्यादीला जाळ्यात ओढले आणि पैशांची मागणी सुरू केली.
फिर्यादीने सुरुवातीला पैसे देण्यास नकार दिला होता. मात्र, आरोपींनी खासगी चॅट आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तो दबावाखाली आला. या भीतीपोटी फिर्यादीने ३० एप्रिल २०२४ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत ३२ व्यवहारांद्वारे एकूण २३.६१ लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले.

त्यानंतरही धमक्या सुरूच राहिल्याने जानेवारी २०२६ मध्ये फिर्यादीने आणखी ४० लाख रुपये ट्रान्सफर केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सुरुवात केवळ २० हजार रुपयांपासून झाली होती, मात्र पुढे रक्कम लाखोंमध्ये पोहोचली.

या प्रकरणी व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई क्राइम ब्रांचने कारवाई करत फरखंदा खान आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचाही तपास केला जात आहे.