अल्पवयीन मुलावर मुलाकडूनच जबरदस्तीने लैगिक अत्याचाराचा प्रयत्न; उरुळीकांचन पोलिस ठाण्यात ‘पॉक्सो’ कायद्याने गुन्हा दाखल…

उरुळी कांचन : “तू मला खूप आवडतोस” असे म्हणत एका 16 वर्षीय अल्पवयीन बालकाचा जबरदस्तीने मुका घेऊन व अश्लील चाळे केल्याचा प्रकार उरुळी कांचन (ता. हवेली) येथे नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी अष्टापूर (ता. हवेली) येथील ग्राफिक डिझायनरवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नागराज कोतवाल, (धंदा – ग्राफिक डिझायनर, पुर्ण नाव व पत्ता माहित नाही रा. अष्टापुर ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 16 वर्षाच्या मुलाने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हि घटना शुक्रवारी (ता. 17) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कस्तुरी लॉन्स समोर असलेले नागराज ग्राफीक्स येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित 16 वर्षीय मुलगा शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील कस्तुरी लॉन्स समोर असलेल्या आरोपी कोतवाल याच्या ‘नागराज ग्राफिक्स’ येथे कामानिमित्त गेला होता. काम संपल्यानंतर आरोपी नागराज कोतवाल याने पीडिताला “घरी फोन करून सांग की काम जास्त आहे, उशीर होईल” असे म्हणत हॉटेलवर थांबण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर, आरोपीने आपल्या निळ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून पीडिताला पुणे-सोलापूर महामार्गावरील भांडगाव (ता. दौंड) येथे नेले. तेथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून, “तू मला खूप आवडतोस” असे म्हणत पीडिताचा जबरदस्तीने मुका घेतला आणि अश्लील चाळे केले. तसेच लॉजवर चालण्याबाबत विचारणा करून पीडितावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा आरोपी कोतवाल याने पिडीत मुलाला रात्री पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथे त्याच्या नागराज ग्राफीक्स ऑफीसवर घेवून आला. यावेळी त्याच्या ऑफीसवर कामाला असलेल्या एका मुलासोबत फिर्यादी हे घरी निघून गेले. घाबरलेल्या पीडिताने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला.
दरम्यान, त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास नागराज कोतवाल याने पुन्हा फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडिताने आपल्या आईसह उरुळी कांचन पोलीस स्टेशन गाठले. याप्रकरणी आरोपी कोतवाल याच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 कलम ७, ८, ११ (१) आणि १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे हे करत आहेत.