पुण्यात अनैतिक संबंधाचा भयानक शेवट! पतीच्या प्रेयसीचा असा काढला काटा की सगळेच हादरले..

पुणे : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

अनैतिक संबंधांच्या संशयातून एका महिलेचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कार्यालयातच हत्या करून मृतदेह पोत्यात लपवून ठेवण्यात आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील विधी शाखेशी संबंधित ॲडव्होकेट संजय सावंत यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या पूनम दिनेश मुन या महिला सेक्रेटरी होत्या. सावंत आणि पूनम यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय सावंत यांची पत्नी स्वाती सावंत यांना होता. या संशयावरून दोघींमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, 16 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सावंत यांच्या कार्यालयात संजय सावंत, त्यांची पत्नी आणि अल्पवयीन मुलीने पूनम मुन यांना मारहाण केली. त्यांच्या पायांना दोरीने बांधून त्यांच्यावर बॅटने हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतदेह पोत्यात भरून तो कार्यालयातच लपवण्यात आला. पुढील दिवशी त्याची विल्हेवाट लावण्याचा त्यांचा विचार होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

पूनम मुन गेल्या साडेतीन वर्षांपासून या कार्यालयात काम करत होत्या. घटनेच्या दिवशी त्या नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. दुपारी त्यांच्या पती दिनेश यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन लागला नाही. रात्री उशिरापर्यंत त्या घरी परतल्या नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी चिंतेतून शोध सुरू केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे पती कार्यालयात पोहोचले असता त्यांना एक पोते दिसले. संशय आल्याने त्यांनी ते उघडून पाहिले असता त्यामध्ये पूनम यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.