धक्कादायक! मूल देतो म्हणणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश, संगमनेरमध्ये खळबळ…


संगमनेर : राज्यात आणि देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अशोक खरात याच्याबाबत नवनवी माहिती समोर येत असताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील राजेंद्र गडगे यानेही मोठा गोंधळ घातल्याचे समोर आले आहे.

श्रद्धेच्या नावाखाली भोळ्या भक्तांकडून हजारो रुपयांची फसवणूक करणारा तसेच झटक्यात कॅन्सर बरा करण्याचा दावा करणारा राजेंद्र गडगे याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. मंत्रोच्चाराने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा संगमनेरचा राजेंद्र गडगे करायचा. त्याच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

अखेर गडगेच्या कारवायांची दखल घेत पोलिसांनी त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायदा, आयटी कायदा, ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज कायदा, मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट तसेच बनावट व्हिडिओ तयार केल्याप्रकरणी आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत कारवाई केली आहे. या प्रकरणी अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील दत्तधाममध्ये एक तथाकथित महाराज मंत्रोच्चार करून शारीरिक आजार बरे करत असल्याचा दावा करत असल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला गडगे महाराज म्हणून ओळख करून देणाऱ्या या व्यक्तीभोवती मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी होत होती. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. “क्षणात आजार बरे होतात” असा दावा करत असल्याने लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी त्याच्याकडे होत असल्याचे दिसून येत होते.

लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आरोपीकडून ११ हजार, २१ हजार, ५२ हजार अशा विविध रकमा घेऊन फसवणूक केली जात असल्याचे समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि अंनिसने त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती.

या प्रकरणात राजेंद्र गडगे याच्यासोबतच त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी या सर्वांवर अटकेची कारवाई केली.

संगमनेरमधील दत्तधाम सरकार नावाने गडगे महाराज याने आपले जाळे उभे केले होते. भोळ्या भक्तांना फसवून त्याने मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्याचा आरोप आहे. कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसताना आजार बरा करण्याचे आश्वासन देत त्याने लोकांकडून पैसे घेण्यासाठी नाट्यमय प्रकार केल्याचे समोर आले आहे. या माध्यमातून त्याने लाखोंची संपत्ती जमा केल्याचा दावा करण्यात येत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!