आनंदाची बातमी! LPG महागाईवर ब्रेक? सरकारचा नवा प्लॅन, किचन खर्च होणार कमी…

मुंबई : आखाती प्रदेशातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा संकट गडद होत असून त्याचा परिणाम भारतातील इंधन पुरवठ्यावरही जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही प्रमाणात इंधन पुरवठ्यावर मर्यादा आणल्याचे दिसून येत आहे.

एलपीजी गॅसच्या किंमतीतील चढ-उतार आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट तसेच मोठ्या संस्थांना सातत्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या समस्येवर उपाय म्हणून सरकारकडून स्वदेशी आणि टिकाऊ पर्यायांचा शोध घेतला जात आहे.
मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, व्यावसायिक स्वयंपाकासाठी इथेनॉलचा वापर करण्याचा पर्याय सरकार गंभीरपणे विचाराधीन ठेवत आहे. सरकार इथेनॉलच्या वापरावर गंभीरपणे विचार करत असून ही योजना प्रत्यक्षात आली, तर भविष्यात व्यावसायिक स्वयंपाकघरांमध्ये एलपीजी सिलेंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.

समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे 1,000 कोटी लिटर अतिरिक्त इथेनॉल क्षमतेचा वापर स्वयंपाकासाठी करण्याचा प्रस्ताव आहे. यासंदर्भात येत्या काही आठवड्यांत सविस्तर योजना तयार केली जाणार असून ती आंतर-मंत्रालयीन समितीसमोर सादर केली जाऊ शकते.

हायड्रस इथेनॉल हा व्यावसायिक एलपीजीच्या तुलनेत स्वस्त पर्याय ठरू शकतो. या इंधनात सुमारे ९५ टक्के इथेनॉल आणि उर्वरित पाणी असते, त्यामुळे त्याला अतिरिक्त डीहायड्रेशन प्रक्रियेची गरज भासत नाही आणि उत्पादन खर्चही कमी राहतो.
सध्या व्यावसायिक एलपीजीची किंमत सुमारे १०३ रुपये प्रति किलो आहे, तर हायड्रस इथेनॉल अंदाजे ७० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होऊ शकतो. मात्र, इथेनॉलची कॅलोरिफिक व्हॅल्यू एलपीजीपेक्षा कमी असल्यामुळे त्याच प्रमाणात उष्णता मिळवण्यासाठी इथेनॉलचा वापर अधिक प्रमाणात करावा लागू शकतो, ही बाबही लक्षात घेण्यासारखी आहे.
भारतात इथेनॉल प्रामुख्याने ऊस, मका आणि तांदळापासून तयार केले जाते आणि त्याचा वापर जैवइंधन म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलची विक्रीही सुरू असून पर्यायी इंधनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.
स्वयंपाकासाठी वापरला जाणारा इथेनॉल हा वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या इथेनॉलपेक्षा वेगळा आणि तुलनेने स्वस्त असतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात हॉटेल, विमानतळ आणि रेस्टॉरंटसारख्या व्यावसायिक ठिकाणी स्वयंपाकासाठी इथेनॉल वापरण्याची योजना सरकारकडून आखली जात आहे.
सध्या या प्रस्तावावर चर्चा सुरू असून त्याला मंजुरी मिळाल्यास एलपीजी सिलिंडरवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. तसेच इथेनॉल स्वस्त असल्यामुळे भविष्यात सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.