अजितदादांच्या विमान अपघाताच्या तपासाला वेग, रोहित पवार यांनी घेतली कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट, भेटीत नेमकं काय घडलं?

बंगलोर : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. असे असताना मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रयत्न करून देखील एफआरआय दाखल करून घेतला नाही. यामुळे रोहित पवार यांनी प्रयत्न करून तो कर्नाटकमध्ये दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आता रोहित पवार म्हणाले, अनेक प्रयत्न करुनही अजितदादांच्या विमान अपघाताचा गुन्हा दुर्दैवाने महाराष्ट्रात दाखल होऊ शकला नाही, पण कोणताही वशिला न विचारता कर्नाटक पोलिसांनी झिरो नंबरने हा गुन्हा दाखल करुन घेतला.
नंतर तो महाराष्ट्राकडं वर्ग केला आणि कर्नाटकातील प्रशासन हे संविधान आणि नियमानुसारच चालतं, हेही यानिमित्ताने दाखवून दिलं. खुद्द अजितदादा उपमुख्यमंत्री असलेल्या गृहराज्यातील त्यांच्याच युतीचं सरकार असूनही दादांना न्याय मिळाला नाही पण कर्नाटकने मात्र त्यांना न्याय देण्याचं काम केलं.

प्रशासनाकडून कसं काम करुन घ्यायचं हे त्या विभागाचे प्रमुख म्हणून मंत्री महोदयांवर अवलंबून असतं. त्यामुळं न्यायाच्या या लढाईत केलेल्या सहकार्याबद्दल कर्नाटकचे गृहमंत्री मा. डॉ. जी. परमेश्वर साहेब यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी कर्नाटक काँग्रेसचे नेते विजयसिंह, कर्नाटक युवक काँग्रेसचे अध्यक्ष मंजुनाथ गौडा, काँग्रेस प्रवक्ते अतुल जी लोंढे, रविकांत वरपे आणि गणेश उबाळे उपस्थित होते. याबाबत आमदार रोहित पवार यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे.