यात्रेच्या दिवशी आयुष्याचा शेवट! वडिलांनी पिकांना पाणी द्यायला सांगितलं, रागाच्या भरात शेतात गेला अन्…

सोलापूर : राज्यात सध्या अनेक खेडेगावात ठिकाणी यात्रा सुरु आहेत. असे असताना सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगाव येथे गावातील यात्रेच्या दिवशी शेतात पाणी द्यायला सांगितल्यामुळे रागाच्या भरात अवघ्या 16 वर्षाच्या पैलवान मुलाने शेतातच गळफास लावून आत्महत्या केली आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हरिदास अशोक मोरे असे आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचे नाव आहे. हरिदासने गळाफास घेतलेले पाहताच त्याचा भावाने दोरी कापून त्याला खाली उतरविले. भावाने लगेच पित्याला बोलावून घेत त्याला लगेच शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
त्याच्या पश्चात आई वडिल, एक लहान आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे. हरिदास हा गावातील तालमीत कुस्तीचे धडे घेत होता, त्याला भविष्यात पैलवान व्हायचे होते. तो इयत्ता नववीमध्ये शिकत होता. रविवारी, गावात यात्रा असल्यामुळे हरिदासला यात्रेत जायचे होते, पण अचानक वडिलांनी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्यास सांगितलं.

त्यामुळे हरिदास वडिलांवर चिडला होता, शेतात पाणी देण्यास गेला. मात्र तिथे जाताच त्याने गळफास घेतला. हरिदासच्या वडिलांनी शेतात पाणी घालून मग जत्रेला जा असे त्याला सांगितले. पण यात्रेचा दिवस असल्यामुळे त्याने शेतात जायला नकार दिला. पण नंतर वडिलांच्या सांगण्यावरून तो मित्राच्या गाडीवरून शेतात गेला.
त्याचा राग पाहून कुटुंबियांना संशय आला. यामुळे पित्याने त्याच्या भावाला थोड्या वेळाने पाठवून दिलं. पण तोपर्यंत हरिदास शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लटकलेला होता. हरिदासला कुस्त्यांची खूप आवड होती. गावाच्या तालमीत तो कुस्त्यांचे धडे घेत होता. जिल्हा पातळीवर अनेक कुस्त्यांत 62 किलो वजनीगटात त्याने पदक मिळवले होते.